
रत्नागिरी, चिपळूणमध्ये राखी संकलन कार्यक्रमप्रसंगी मांडली स्पष्ट भूमिका…
भाजपाचे संघटन मजबूत असून निधीची कमतरता पडणार नाही अशी दिली ग्वाही…
रत्नागिरी \ चिपळूण (प्रतिनिधी): हिंदू म्हणून आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. लव्ह जिहाद सारखे प्रकार करू शकत नाही. कारण आपला हक्काचा भाऊ मुख्य खुर्चीवर बसले आहेत. ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे. विकास होतच राहणार आहे. पण या रक्षाबंधानासारख्या पवित्र सणाच्या निमित्ताने हिंदू म्हणून धर्म रक्षणासाठी आपणही पुढे आले पाहिजे, लव्ह जिहाद सारख्या घटना रोखण्यासाठी केवळ सोशल मिडीयावर प्रतिक्रिया न देता प्रत्यक्ष कृतीत सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये आयोजित राखी संकलन कार्यक्रमप्रसंगी केले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने ‘एक राखी देवा भाऊंसाठी’ अभियान राबवत राज्याच्या विविध भागांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो राख्या पाठविल्या जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह त्यांनी राबविलेल्या लोकाभिमुख योजनामुळे महिलांसह सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. त्या बद्दल या राख्या पाठविल्या जात असून रत्नागिरीत त्याला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिपळूण, रत्नागिरी, लांजा राजापूर आणि संगमेश्वर येथून संकलित झालेल्या तब्बल १ लाखांहून अधिक राख्या आज संपर्क मंत्री म्हणून नितेश राणे यांच्याकडे महिला मोर्चाकडून देण्यात आल्या आणि त्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी रत्नागिरीत प्रदेश महिला मोर्चा प्रतिनिधी आणि संकलन प्रमुख शिल्पा मराठे, जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, दक्षिण भाजप महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, यांच्यासह मोठ्या संख्येने तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. तर चिपळूण येथेही भाजपा महिला प्रदेश मोर्चा उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
चिपळूण येथील या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रामदास राणे, वसंत ताम्हणकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस राज्याच्या प्रगतीसाठी , विकासासाठी प्रयत्नशील आहेतच तर गृहमंत्री पद सांभाळताना हक्काचा देवाभाऊ म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत. यामुळेच रक्षाबंधनासारखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातून प्रत्येक बहिणीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. सन २०१४ -२०१९ तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे हिताचे जे निर्णय घेतले आहेत. यातून राज्याचा विकास होतांना दिसत आहे, असे मत मांडले. तर रत्नागिरी येथे मार्गदर्शन करताना ना. राणे म्हणाले कि राखी हा सण हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण असून यामध्ये महिला भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी असते. एकीकडे हे कर्तव्य पार पाडत असतानाच आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, केवळ सोशल मिडीयावर अंगठे दाखवून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून हिंदू धर्म रक्षणासाठी बाहेर पडले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जी राखी बांधली जाते ती धर्म रक्षणासाठी. त्यामुळे माता-बहिणींच्या रक्षणासाठी, तसेच ‘लव्ह जिहाद’सारख्या धोक्यापासून हिंदू धर्माला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे, त्याला वेळीच उत्तर दिले पाहिजे आणि धर्म मजबूत केला पाहिजे असेही ना. राणे म्हणले.

उत्तम संघटन आणि उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या राखी संकलन उपक्रमाचे ना. राणे यांनी कौतुक केले. यातून पक्ष संघटन आणि शिस्त दिसून आली, महिला मोर्चाने दिलेली जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने पार पाडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत त्यांना दिलेल्या शुभेच्छा कौतुकास्पद आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसह अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. विरोधक यावर टीका करत असले तरी, खुद्द महाविकास आघाडीतील अनेक लोक या योजनांचा लाभ घेत आहेत अशी कोपरखळी मारून या विकासकामांचा लाभ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ना. राणे यांनी कार्यकर्त्यांना एकसंध राहून काम करण्याचे आवाहन केले. “तुमच्या प्रत्येक कामाची नोंद होत आहे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रत्येक कामाची दाखल घेत आहेत. भाजपा पक्ष संघटना मजबूत होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिची ताकद दिसून येईल. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असे त्यांनी सांगितले. निधीची काळजी करण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा ढेकणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*l