दिवा ( सचिन ठिक ) “अडली गाय आणि फटके खाय” या उक्तीनुसार सध्या दिव्यातील लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांची अवस्था निर्माण झाली असून सकाळी दिवा ते ठाणे असा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.संपुर्ण ठाणे जिल्ह्यात दिवा जंक्शन प्रसिद्ध असला तरी या ठिकाणी दिवेकर नागरिकांना हक्काची लोकल नसल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.
दिवा शहर हे संपुर्णतहा रहिवाश्यांना राहण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.सर्वसामान्य नागरिकांना परवडत असलेली घरे मिळत असल्यामुळे आर्थित स्थिती बेताची असलेले नागरिक या ठिकाणी वास्तव्यात आहेत.या ठिकाणी कोणतेही कारखाने नाहीत.परंतु संपुर्ण कामगार वर्ग याठिकाणी राहण्यास मोठ्या संख्येने आहे.त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अश्या नागरिकांना येथे राहण्याशिवाय कोणताही पर्यात सध्यातरी नाही.त्यामुळे “अडली गाय आणि फटके खाय” अशी परिस्थिती येथील लोकल प्रवाशी नागरिकांची झाली आहे.समोर मृत्युचे संकट आहे.परंतु पोटासाठी आफीसला पोहचावेच लागेल अन्यथा पगार कापला जाईल या भितीने कितीही गर्दी असली तरी अश्या नागरिकांना भर गर्दीत जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता दिवा स्थानकावर सकाळी 7 नंतर पाहीले असता या ठिकाणी संपुर्ण स्थानक गर्दीने भरुन गेलेले पहावयास मिळत आहे.यात पुरुष प्रवाश्यांसह महिला प्रवाश्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.जर प्रवाश्यांना ठाण्याच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर अश्या नागरिकांना जीव मुठीत धरुन लटकत प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही अन्यता 5 ते 10 रेल्वे लोकल सोडण्याशिवाय पर्याय नाही.अगोदर बदलापूर,कर्जत,कसारा,कल्याण येथून प्रवाशी रेल्वे गाडी फुल होऊन येत असल्यामुळे स्थानकातून जाणाऱ्या रेल्वेकडे नुसतं बघावे लागत आहे.काहींना अश्या घटनांमुळे कामावर वेळेत पोहचता येत नाहीत.तर काहीजण डोंबिवली स्थानकापर्यंत जावून पुन्हा रिटर्न मारणे असा त्यांचा दिनक्रम चालू आहे.अश्या संपुर्ण गर्दीतून जर एखाद्याने गर्दीच्या गाडीतून धाडसाने प्रवास केलाच तर त्याला लटकत जाण्याशिवाय पर्याय नाही.
दिवेकरांसाठी एकही लोकल नसलेला जंक्शन “दिवा जंक्शन“
ठाणे किंवा मुंबईतील स्थानकांत पाहीलात तर सर्वाधिक गर्दी ही दिवा स्थानकात झालेली आपणांस पहायवयास मिळते.या जंक्शनमधून वसई विरार,पनवेल,कोकण येथेही गाड्या सुटतात असे हे प्रसिद्ध जंक्शन आहे.परंतु नोकरीनिमीत्त मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी येथून एकही लोकल नाही अशी ओळख निर्माण झाली आहे.पुर्वीपेक्षा आता डिजीटल तिकट,सरकते जीने,नवीन स्थानकांची निर्मीती,स्थानकावर मुतारी होत असली तरी या ठिकाणी जीव मुठीत धरुन प्रवास करणाऱ्या तसेच मृत्युलाही समोरे जाणाऱ्या प्रवाश्यांना एकही लोकल नाही यांची गंभीर दखल येथील लोकप्रतिनिधी,राजकीय पुढारी,समाजसेवक,सर्वपक्षीय नेते यांनी राजकारण मध्य़े न आणता घेतली पाहीजे ही अपेक्षा आहे.अन्यथा दिव्यातील अनेक नागरिकांचे जीव जाण्याची शक्यता आहे.