
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आज देशभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करून तब्बल १०३ मिनिटांचे भाषण दिले. अर्थव्यवस्था, रोजगार, स्वावलंबन, संरक्षण आणि जागतिक राजकारण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार केला….
नवी दिल्ली प्रतिनिधी- भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आज देशभर उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करून तब्बल १०३ मिनिटांचे भाषण दिले. अर्थव्यवस्था, रोजगार, स्वावलंबन, संरक्षण आणि जागतिक राजकारण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अणू हल्ल्याच्या विधानाला उत्तर देताना मोदी म्हणाले, “अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही.” पहलगाम हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांनी पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचाही दावा केला.
सिंधू पाणीवाटप करार ‘अन्यायकारक आणि एकतर्फी’ असल्याचं सांगत भविष्यात तो सहन न करण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला. “आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही” असं ते म्हणाले.


तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट नामोल्लेख टाळत अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, “जागतिक परिस्थितीत सर्वजण स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. आपल्याला कणखरपणे आर्थिक संकटांचा सामना करायचा आहे. कोणाचाही स्वार्थ आपले नुकसान करू शकणार नाही.”
तरुणांसाठी रोजगार योजना…
मोदींनी आजपासून लागू होणारी ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ जाहीर केली. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५००० रुपयांचं अनुदान दिलं जाईल. या योजनेसाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

अर्थव्यवस्था व सुधारणा…
पंतप्रधानांनी सांगितलं की, या दिवाळीत नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा जाहीर केले जातील, ज्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील. गेल्या काही वर्षांत ४०,००० पेक्षा जास्त नियम आणि १५०० जुने कायदे रद्द करण्यात आले आहेत. देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प त्यांनी मांडला. तसेच वर्षाअखेर ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भरतेचा संदेश…
स्वदेशी उत्पादन आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यावर मोदींनी विशेष भर दिला. खत, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आणि इतर महत्त्वाच्या उत्पादनात देशाला स्वावलंबी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “स्वावलंबन कमी झालं तर ताकदही कमी होते” असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदींच्या भाषणात एकीकडे आत्मनिर्भर भारताचा स्पष्ट रोडमॅप होता, तर दुसरीकडे जागतिक मंचावर भारताची ठाम भूमिका अधोरेखित झाली. रोजगार, अर्थसुधारणा, सिंधू करारावरील कठोर भूमिका आणि सुरक्षा विषयक मुद्दे हे भाषणाचे केंद्रबिंदू ठरले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर