
माणगाव- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये भीषण अपघात घडला आहे. महाडकडून पुण्याच्या दिशेला जाणारी भरधाव वॅगनर कार थेट कंटेनरच्या खाली घुसल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉ. पल्लवी पळशीकर (वय-३५ रा. लातूर, सध्या रा. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
डॉ. पल्लवी पळशीकर आणि डॉ. विशाल रमेश बडे हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याला जात होते. त्यांच्या कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की कारचा समोरचा भाग पूर्णपणे कंटेनरच्या पाठीमागील चॅशीच्या खाली जाऊन फसला. या अपघातात डॉ. पल्लवी पळशीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत असणारे चालक वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रमेश बडे यांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत.

या अपघाताची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या मदतीने मृत डॉ. पल्लवी पळशीकर आणि जखमी डॉ. विशाल रमेश बडे यांना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक एस. एन. रासकर करीत आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर