
चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील एका अवघड वळणावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. शौकिन (वय ३३, रा. राजस्थान) असे मृत चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकिन हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच ०३ सीके ४२०८) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. भोस्ते घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका कारला (एमएच ०८ एएक्स ९३४८) धडक दिली. त्यानंतर कंटेनर संरक्षक भिंतीवर आदळला. या अपघातात कंटेनरचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. खाली कोसळलेला चालक थेट चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आपल्या सहकाऱ्यांसह मदतीसाठी पोहोचले. कंटेनरच्या चाकाखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती. त्यासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाल्यावर रस्त्यात अडकलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भोस्ते घाटातील या अवघड वळणावर अपघात होण्याच्या घटना वाढत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर