सिराजची सनसनाटी आणि इंग्लंडची शरणागती! पाचव्या कसोटीत भारताचा ६ धावांनी थरारक विजय; मालिका २-२ अशी बरोबरीत…

Spread the love

लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सोमवारी तमाम क्रीडाप्रेमींना भारताच्या लढाऊ वृत्तीचा अप्रतिम नजराणा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला.



लंडन : लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सोमवारी तमाम क्रीडाप्रेमींना भारताच्या लढाऊ वृत्तीचा अप्रतिम नजराणा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (१०४ धावांत ५ बळी) केलेल्या सनसनाटी माऱ्याच्या बळावर भारताने ही कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. त्यामुळेच अवघ्या जगभरातून सध्या सिराजसह भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताला ३७४ धावांचा बचाव करायचा होता. त्यातच अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५, तर भारताला विजयासाठी ४ बळींची आवश्यकता होती. मात्र सिराज, प्रसिध कृष्णा (१२६ धावांत ४ बळी) या वेगवान जोडीने सुरुवातीच्या तासाभरात अफलातून गोलंदाजी करत झटपट तीन बळी मिळवले. मग एका हाताने फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ख्रिस वोक्सच्या साथीने गस ॲटकिन्सन इंग्लंडला विजयीरेषा गाठून देणार असे वाटले.


मात्र सिराजने ८६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर गस ॲटकिन्सनचा (१७) त्रिफळा उडवला आणि भारताच्या ऐतिहासिक विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा दुसरा डाव ३६७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे जो रूट, हॅरी ब्रूक यांच्या शतकानंतरही इंग्लंडच्या पदरी निराशा पडली. तर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताने एकजुटीची ताकद दाखवत देत ‘यंग ब्रिगेड’च्या बळावर ५ लढतींची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. मुख्य म्हणजे या मालिकेतील पाचही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत रंगल्या. त्यावरूनच दोन्ही संघांमध्ये कितपत कमालीची चुरस होती, हे अधोरेखित होते.

लढतीत एकूण ९ बळी मिळवणाऱ्या सिराजलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर पाच सामन्यांत सर्वाधिक ७५४ धावा करणारा गिल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. इंग्लंडकडून ब्रूकला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. विजयानंतर भारतीय संघाने संपूर्ण मैदानाला फेरी मारून चाहत्यांचे आभार मानले.

सलग दुसरा विजय..

ओव्हलवर भारताने सलग दुसरा विजय नोंदवला. २०२१च्या दौऱ्यातही भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. एकंदर ओव्हलवरील १६ कसोटी सामन्यांत भारताचा हा तिसरा (१९७१, २०२१, २०२५) विजय ठरला.

संक्षिप्त धावफलक-

भारत (पहिला डाव) : २२४

इंग्लंड (पहिला डाव) : २४७

भारत (दुसरा डाव) : ३९६

इंग्लंड (दुसरा डाव) : ८५.१ षटकांत सर्व बाद ३६७ (हॅरी ब्रूक १११, जो रूट १०५; मोहम्मद सिराज ५/१०४, प्रसिध कृष्णा ४/१२६)

सामनावीर : मोहम्मद सिराज

मालिकावीर : हॅरी ब्रूक, शुभमन गिल

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page