तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात… भुमिपुत्र राहा…
कोकण : कोकणातील रायगड, रत्नागिरीसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक आता मुंबई, ठाणे,पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. मात्र शहराकडील हे
स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. यासाठी कोकणातील तरुणांनी आपल्या गावाकडे लक्ष देऊन आधुनिक शेतीकडे लक्ष दयायला हवे.विविध जोडधंदे करुन स्वःतासह कुटूंबाचा विकास साधायला हवा.कोकणात छोटी-मोठी गांव, वाड्या आहेत. परंतु अशा ठिकाणी केवळ वयोवृद्ध आजी-आजोबा व क्वचित तरुणवर्ग दिसतो. बहुसंख्य घरे ही कुलूपबंद आहेत. तर शेती ओसाड पडली आहे.साहजिकच रोजगार नसल्याने तरुणवर्ग हा छोटी-मोठी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळत आहे. गणेशोत्सव, होळी, दसरा, जत्रा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो. एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते.
हे सर्व भयानक आहे, काही वर्षांत ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही. म्हणून कोकणातील तरुण-तरुणी यांनी खेड्यापाड्यातच राहून करण्या योग्य स्वंयरोजगार करुन समृद्ध कोकण बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गावे, गावातील शाळा बंद होत आहेत. हे सर्व का घडतंय? कारण रोजगार नाही, शेती आहे पण चांगले पीक नाही. वर्षभर पुरेल इतके उत्पन्न नाही, मुलांना चांगले शिक्षण नाही, वैद्यकीय उपचार पुरेसे नाही, असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहेत.
चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळत नाही म्हणून भुमिपुत्र आपली शेती, जागा कवडीमोल किंमतीत विकून मोकळे होतील. पण याचा
फायदा परप्रातियांना होईल. सर्वांत धक्कादायक म्हणजे भुमिपुत्र आज परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यातून बाहेरून आलेले लोंढे स्वतःचे व्यवसाय टाकून घर करून बसले आहेत. सरकार कोणाचेही
असो, कायम या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं; पण या पुढे सर्व प्रश्नाची दखल घेऊन काळजीने लक्ष दिले पाहिजे.
१५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा. कोकणाता नद्या, निसर्ग,धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होतेआहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मत्स्योद्योग,शेती, पर्यटन, फलोद्यान इ. क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे. गरज आहेती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची. तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात… भुमिपुत्र राहा… नाही तर उद्या आपल्याला आपल्याच गावात… वाडीत पाहुणे व्हावे लागेल. तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला… आधुनिक शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार करा. आपले कोकण समृद्ध करा.
महाराष्ट्र संरक्षण संघटना ; धर्मेंद्र घाग
जाहिरात :