
मुंबई- गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) काही नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवण खराब दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हे प्रकरण ताजं असतानाच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला.
दरम्यान या सर्व घटनांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच सुनावलं आहे. गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात? असा प्रश्न मला विचारला जातो. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं, असं म्हणत यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करावी लागणार नाही, तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे, असंच समजून कामं करा. कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना म्हटलं आहे.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर