ठाणे :शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; ना दरवाजे, ना सुरक्षा… लोखंडी पट्ट्यांना धरून टेम्पोतून जीवघेणा प्रवास, आरटीओ निद्रावस्थेत…

Spread the love

अंबरनाथमधील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडल्याच्या घटनेला अद्याप आठवडाही उलटला नसताना आणखी एक धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे…

ठाणे : अंबरनाथमधील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडल्याच्या घटनेला अद्याप आठवडाही उलटला नाही. यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात होली फेथ इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. धक्कादायक म्हणजे या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही आणि टेम्पोचा मागचा भाग उघडाच आहे.यातच मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही (सहाय्यक) त्यांच्यासोबत नाही. चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्यांचा आधार घेऊन उभे आहेत. दुर्दैवाने टेम्पो भरधाव वेगात असताना थोडा तरी अनियंत्रित झाला तर या निष्पाप मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. ही मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन आक्रीत घडण्याची शक्यता आहे.

अंबरनाथच्या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. यानंतर कल्याण आरटीओने तेथील काही शाळांना नोटिसा बजावल्या आहेत. पण प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई यापैकी काहीच झालेले दिसत नाही. धक्कादायक म्हणजे याच आरटीओ कार्यालयाच्या अवघ्या ५ किलोमीटर परिसरात एका टेम्पोमधून अशा प्रकारची जीवघेणा प्रकारची ने आण करताना दिसत आहे आणि तरीही आरटीओच्या अधिकारी निद्रावस्थेत आहेत. या यंत्रणेला पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग सापडलेला दिसत आहे – ‘तक्रार करा, मग आम्ही पाहू.’

पालक संतप्त होऊन विचारत आहेत – अपघात झाल्यावरच तुम्हाला जाग येणार का? मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? त्यामुळे अशा घटनांना आता तरी आळा बसणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page