
रत्नागिरी/प्रतिनिधी- शोभिवंत मत्स्यपालन या व्यवसायासाठी शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयचे मोलाचे योगदान आहे. आपण सर्वजण छंद म्हणून मत्स्यालय जोपासतो. हे शोभिवंत मासे आपल्या घराची शोभा वाढवतात, मानसिक ताण कमी करतात, मत्स्य शेतकाऱ्यांची आर्थिक उन्नती देखील करतात. त्यासाठीची शास्त्रशुद्ध माहिती, शेतकाऱ्यांमधील शोभिवंत मत्स्य शेतीतील संवाद आणि व्यवसाय वाढीसाठीची या महाविद्यालयातून सदैव मदत होईल, अशी ग्वाही सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ चे मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक ११ जुलै रोजी परिषद दालन, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी भूषविले. या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या राज्य स्तरीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २०० हून शोभिवंत मत्स्य शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.
*आपल्या अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी गेल्या ४५ वर्षांमध्ये महाविद्यालयातून विविध प्रशिक्षण घेतलेले पण आता शोभिवंत मत्स्य उद्योजक झालेल्या सर्व उद्योजकांचे कौतुक केले.*
याप्रसंगी शोभिवंत मत्स्य शेतकरी प्रतिनिधी हसन म्हसलाई यांनी व्यवसाय वाढीसाठी परदेशातील अद्ययावत तंत्रज्ञान उत्पादनवाढीसाठी आपण अवगत करून या क्षेत्रात ठसा उमटवावा असे उपस्थितांना आवाहन केले. त्याचबरोबर शोभिवंत मत्स्य व्यवसायांतर्गत बीज विक्री, औषधे विक्री, खाद्य विक्री इत्यादी क्षेत्रात तज्ञ मनुष्यबळ आवश्यक असल्याचे देखील नमूद केले.
यानंतर पार पडलेल्या तांत्रिक सत्रात विविध व्याख्यानात तज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यात ‘शोभिवंत मत्स्यसंवर्धन सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी’ याविषयी डॉ. माधुरी पाठक, ‘शोभिवंत माशांना होणारे रोग आणि त्यांचे निदान’ याविषयी डॉ. गजानन घोडे, ‘महाराष्ट्रात शोभिवंत माशांवरील संशोधन आणि विकास’ याविषयी डॉ. भरत यादव, ‘शोभिवंत माशांच्या टाकीमध्ये प्रकाश योजना’ याविषयी श्री. योगेश मोडक, ‘शोभिवंत मासे व खाद्याचे विक्री व्यवस्थापन’ याविषयी श्री. मॅथ्यूज, ‘शोभिवंत मासे पालन व्यवसाय वृद्धीसाठी शासकीय योजना’ याविषयी श्रीमती. उत्कर्षा किर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर “शोभिवंत मत्स्य संवर्धकांची संशोधन आणि विकस अपेक्षा” याविषयीच्या गटचर्चेत सर्वश्री श्रीराम हातवळणे, हसन म्हसलाई, मेहमूद सय्यद, किशोर सामंत, अल्बर्ट अमन्ना, फ्रान्सिस गोन्साल्वीस, लॉर्ड्स फर्नांडिस, अमित देवरे, सचिन सुर्वे, स्वप्निल पेणकर, जावेद शेख आदींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या औचित्याने शोभिवंत माशांच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना सन्मानित करण्यात आले. त्यात शोभिवंत माशांच्या व्यवसायात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असणारे श्री. विस्पी मेस्त्री आणि श्री. श्रीराम हातवळणे यांना रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले. तसेच या व्यवसायात पदार्पण केलेल्या श्री. राजेश साळगांवकर, श्री. निशांत शिंदे व श्रीमती. रूपाली मुकादम-कोळी या व्यावसायिकांना प्रेरणा देण्यासाठी ‘नवोदित शोभिवंत मत्स्य संवर्धक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर या व्यवसायात पारंपारीकते बरोबरच आधुनिकतेची कास धरून सचोटीने व्यवसाय करणारे सर्वश्री सुरेंद्र शिरधनकर, कल्पेश नाईक, अमित सुवारे, सुयोग भागवत, चंद्रकांत भालेकर, राहुल म्हात्रे, राजेश पाटील, राजेश सरनाईक, मंगेश पाटील, जगन पवार, गणेश इलेगटी, चेतन साळुंखे, हेमंत पाटील, मुबारक सुतार, सुहास सावंत, मॅथ्यू डिसिल्वा, फ्रान्सिस गोन्सालव्हेस, किशोर सामंत, तन्वीर सय्यद, लाॅर्डस फर्नांडीस, अल्बर्ट अमन्ना आणि श्रीमती विद्या ठक्काय यांच्या कार्याचा गौरव करून सन्मानित करण्यात आले. या एक दिवसीय कार्यशाळेत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, जळगाव, नाशिक, गोवा, इ. भागातील शोभिवंत मत्स्य शेतकरी उपस्थित होते. मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी आणि रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या या
कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले आणि दरवर्षी अशी कार्यशाळा मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी ने आयोजित करावी, असा मानस अनेक शोभिवंत मत्स्य शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
सदर कार्यशाळा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, तसेच शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्था, मुंबई च्या शास्त्रज्ञ डॉ. माधुरी पाठक, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (मिरकरवाडा प्राधिकरण) कु. अक्षया मयेकर, सागरी पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे श्री. मंगेश गावडे, मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य जीवशास्त्र आणि मत्स्य जलशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागरकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, हंस ॲक्वाकल्चरचे श्री. हसन म्हसलाई, रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. फहद जमादार, उपाध्यक्ष श्री. राकेश सावंत, सचिव अमित सुवारे आदी उपस्थित होते.