
संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर येथील संगम जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन 2024 – 25 सालातील इयत्ता दहावी व बारावीतील सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर नावडीच्या सरपंच प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये, उपाध्यक्ष उदय संसारे, माजी अध्यक्ष भिकाजी साळवी, व्यापारी संघ अध्यक्ष प्रमोद भिंगार्डे आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत अध्यक्ष प्रमोद शेट्ये, जनार्दन शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी राजाराम चव्हाण यांना अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी संघाच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रास्ताविक उदय संसारे यांनी केले. संघटनेच्या कामाची माहिती त्यांनी दिली. 15 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय भेटवस्तू साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
माजी अध्यक्ष व संघाचे सल्लागार भिकाजी साळवी यांनी मनोगत व्यक्त केले. पो.नी. राजाराम चव्हाण मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मोबाईलचा अतिरेक टाळा व सायबर गुन्ह्यापासून सावध राहा.
विद्यार्थी अद्वैत झगडे यांनी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाने विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानले. अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मातृ-पितृ गुरु व राष्ट्र न विसरता स्थिर झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी स्मरून समाज कार्य करण्याची सूचना दिली.
तसेच आपल्या कुटुंबीयांना व समाजातील गरजू व्यक्तींना सहकार्य करावे असे सांगितले.
सूत्रसंचालन सचिव श्रीकृष्ण बेंडके यांनी केले.आभार प्रदर्शन उदय संसारे यांनी केले. सदर कार्यक्रमास लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष श्री. प्रकाश कोळवणकर, दादा सेतवडेकर, संघाचे सदस्य प्रभाकर वाडकर, चोचे,जयप्रकाश शिंदे,विनायक पाथरे, विजय निवळकर, बाबासाहेब प्रभावळे, सौ भिंगार्डे, धनाजी पवार, गुप्त पोलीस किशोर जोयशी व संजय रेडीज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.