
रत्नागिरी: रत्नागितील किल्ल्यावरील रत्नदुर्ग पाण- भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (२५, सध्या रा. पिंपळगाव नाशिक रमूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील संशयित प्रियकराने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
जस्मिक केहर सिंग (२९, सध्या रा. सिद्धिविनायक नगर शिवाजीनगर, रत्नागिरी, मुळ रा. भाटिया कॉलनी फतेहाबाद, हरियाणा) असे या संशयित प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात बेपत्ता तरुणीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धाडियाल (६९, रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुरुवार ३ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, फिर्यादींची मुलगी सुखप्रित नाशिकमधून बेपत्ता झाल्याप्रकणी त्यांनी तेथील पिंपळगाव पोलिस ठाण्यात खबर दिली होती.
या बेपत्ता प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सुखप्रित ही रत्नागिरी येथे आलेली असल्याचे त्यांना समजले तेव्हा ते रत्नागिरी येथे गुरुवारी आले होते. त्यावेळी त्यांना रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेले चप्पल आणि ओढणी दाखवली. त्या वस्तू आपल्या मुलीच्याच असल्याचे त्यांनी ओळखले. आपल्या मुलीच्या जिवाचे बरेवाईट झाल्याचे लक्षात येताच त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यांची मुलगी सुखप्रित हिचा मित्र जस्मिक केहर सिंग याने तिच्याशी मैत्री करून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते तोडून दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिप सुरू केले होते.
त्याने तिला वेळोवेळी टाळून तिचा मानकिस छळ केला होता. ती रविवार २९ जून जस्मिकला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे आलेली असताना त्याने तिला न भेटताच तू परत नाशिकला जा, असे सांगितले. त्यामुळे तिला मानसिक त्रास देऊन फिर्यादी यांची मलगी सुखप्रित धाडीवाल हिला शिवसृष्टी भगवती किल्ला रत्नागिरी येथून समुद्राच्या पाण्यात उडी मारुन जीव देण्यासाठी प्रवृत्त केले असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.