
चिपळूण | प्रतिनिधी: रोटरी क्लब चिपळूणने सामाजिक बांधिलकी जपत विशेष मुलांसाठी प्रेरणादायी असा “सितारे जमीन पर” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला. चिपळूणमधील अतिथी थिएटर येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात जिद्द मतिमंद मुलांची शाळा आणि जयदीप मोने उद्योग केंद्र चिपळूण येथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांचा हा चित्रपट विशेष मुलांच्या भावविश्वाला समजून घेत, त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेणारा आहे. त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा, प्रेरणा आणि सकारात्मकतेचे बीज पेरणारा हा चित्रपट दाखवण्यामागचा उद्देश हाच होता, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, प्रकल्पप्रमुख राजेश ओतारी, सचिव डॉ. माधव बापट, डी.बी.जे. कॉलेजचे प्राचार्य वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, डीजी प्रसाद सागवेकर, नितीन देवळेकर, निवृत्त उपजिल्हाधिकारी शंकर पालशेतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना शाळेचे प्राचार्य म्हणाले की, “आमचे विद्यार्थी नृत्य, नाट्य, अभिनय करतातच, परंतु या चित्रपटामुळे त्यांच्या मनातील सुप्त इच्छेला चालना मिळेल. ‘आम्हीही इतरांपेक्षा कमी नाही’ ही भावना त्यांच्या मनात रुजेल.”
शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे, विशेष शिक्षक उमेश कुचेकर, कीर्ती गायकवाड, प्रसन्ना रेडीज, प्रकाश बलाढ्ये, रेखा खंडजोडे, सुनील मयेकर आदी शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी अतिथी थिएटरचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब चिपळूणचा हा उपक्रम विशेष मुलांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या मानसिक विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरले आहे.