
मुंबई :- राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला कडक इशारा दिला आहे. मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री संतप्त झाले आहेत.
मीरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला आणि यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढत आंदोलन केले. तर मनसेने आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले आहे.
मुंबईत मराठी आणि अमराठीवरून झालेल्या वादामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधीच राजकारण तापले आहे. यावरून भाजपा आणि मनसे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मनसेने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
या वादावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर ते सहन केली जाणार नाही आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की भाषेवरून मारहाण करणे अतिशय चुकीचे आहे. आम्ही मराठी आहोत आणि आम्हालाही मराठीचा अभिमान आहे परंतु एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात आणि त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर काय होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री म्हणाले की भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल. भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारवाई केली आहे.
यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही हे देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात मग हा कोणता विचार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.