
रत्नागिरी :- आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी पंढरपुरात जात असतात. दरम्यान, ५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील भाविक, वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार असून हजारो भक्तांनी एसटीचे बुकींग केली आहे. शनिवार ५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता रत्नागिरी बसस्थानक व विविध आगारातून तब्बल ४५ एसटी बसेस पंढरपूरला रवाना होणार आहेत. ९५ चालक-वाहक, एसटीचे एक पथक पंढरपुरात सेवा बजावणार असल्याचे सांगण्यात आले.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश यासह विविध राज्यातून लाखो वारकरी, भाविक दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूरला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. काही वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारकरी उन्ह, वारा अंगावर पावसाच्या सरी झेलत पायी वारी करत आहेत. विठुनामाचा गजर करत, भक्तीत तल्लीन होवून काही वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. तर काही लवकरच पोहोचतील. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जात असतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातूनही एसटी विभागाच्यावतीने वारकऱ्यांसाठी पंढपूरला जाणाऱ्या एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ४५ एसटी बसेसचे बुकींग झाले असून आणखी बुकींग होण्याची शक्यता आहे. ५ जुलै रोजी सकाळी सर्व बसेस पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून शनिवार ५ जुलै रोजी सकाळी 6 वाजता बसस्थानकातून पंढरपूरला बसेस रवाना होतील. आतापर्यंत ४५ गाड्या बुकींग झाल्या आहेत. वारकऱ्यांची संख्या वाढल्यास आणखी काही बसेस बुकींग होण्याची शक्यता आहे असे सचिन सुर्वे, वाहतूक निरीक्षक, रत्नागिरी यांनी सांगितले.