अमली पदार्थ तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा…

Spread the love

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीवर निर्बंध घालणाऱ्या ‘नार्कोटिक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट’ (एनडीपीएस) अंतर्गत अटक झालेले आरोपी जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तोच गुन्हा केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई येईल.  त्यासाठी याच अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी अमली पदार्थ तस्करीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. ‘राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस शाखा स्थापन करण्यात आल्या असून, त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीही केली आहे. जिल्हास्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. यात गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, अमली पदार्थांच्या तस्करीची गंभीर प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अमली पदार्थ तस्करीत अटक झालेले आरोपी जामीन मिळविल्यानंतर पुन्हा तोच गुन्हा करताना आढळल्यास त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अधिवेशन काळातच कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘पोलिस अनुकंपा’वर लवकरच निर्णय

मुंबई: वर्ष २०२२ ते जून २०२५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत मुंबईतील ४२७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी विधान परिषदेत देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात ‘मिशन मोड’वर निकाली काढली जातील. याबाबत सर्व – विभागांनाही आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘कामाच्या तासांचे पालन न केल्यास कारवाई’

‘पोलिसांचे कामाचे तास आठ करण्याचा प्रयोग मुंबईत राबवण्यात आला. काही वेळा सण-उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात, तरीही एकूणच पोलिसांची ड्यूटी आठ तासांची करण्यात आली आहे. जिथे याचे पालन केला जात नाही, तिथे कारवाई केली जाईल’, अशी ग्वाही पोलिसांच्या कामाच्या प्रदीर्घ वेळेबाबत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page