
रत्नागिरी : कधी काळी शालेय वयात उमललेलं नातं… हळूहळू गहिऱ्या प्रेमात रुपांतरीत झालेलं… पण काळाच्या ओघात दुरावा आला. आणि शेवटी, त्या विरहाच्या वेदनेने नाशिक येथील तरुणीने रत्नागिरीत येऊन रत्नदुर्ग किल्ल्याच्या कड्यावरून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी हादरून गेला होता. केवळ चप्पल आणि ओढणीच्या आधारे दोन दिवस आत्महत्येचे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र शालेय जीवनापासून तरुणावर असलेल्या प्रेमासाठी ती रत्नागिरीत आली, परंतु त्याची भेट झाली नाही. या नैराश्यातून तिने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. मात्र 4 दिवसानंतरही तिचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. तिचे नातेवाईक रत्नागिरीत आले आहेत.
नाशिक येथील एका बँकेत काम करणारी ही २५ वर्षीय तरुणी, आपल्या शालेय जीवनातील प्रियकराला भेटण्यासाठी २८ जून रोजी रत्नागिरीत आली होती. तोही रत्नागिरीतील एका बँकेत नोकरीवर होता. मात्र त्यांच्या या 20 वर्षाच्या प्रेमात कुठेतरी माशी शिंकली. आणि त्यातच त्याचं चार महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं. ती आतून पोखरत होती. पण कदाचित शेवटची एक भेट घ्यावी… एक संवाद साधावा… काही तरी स्पष्ट होईल, अशी आशा तिला होती. त्यादृष्टीने ती रत्नागिरीकडे आली असावी.
मात्र नियतीने वेगळंच काही लिहिलं होतं. दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट घडू शकली नाही. आणि २९ जून रोजी, रत्नदुर्गच्या सनसेट पॉईंटवरून तिने आत्महत्या केली. तिच्या चप्पल व ओढणी तेथे आढळून आल्या. त्यानंतरपासून तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर 3 दिवस पोलिस सर्व शक्यता तपासत होते. शाळा, कॉलेज, वसतिगृह आदी ठिकाणी तपास सुरू होता. त्यानंतर 3 दिवसांनी तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं. संबंधित तरुणाकडून माहिती घेतली जात आहे. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. “इतकी वर्षं सोबत घालवलेली नाती… एका क्षणात कोसळतात, तेव्हा मन किती तुटत असेल!” अशा भावना अनेकांच्या प्रतिक्रिया दर्शवत आहेत.
कदाचित तिला कोणत्याही दोषीला ठरवायचं नव्हतं. फक्त मनात साचलेलं काही शेवटचं बोलायचं होतं… उत्तर न मिळालेल्या प्रश्नांना एक दिशा द्यायची होती. पण ती संधीही मिळाली नाही.