
चिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचे काम पावसामुळे थांबविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी या गॅबियन वॉलच्या रचनेत काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत. मात्र, लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरूच असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे.परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे. गतवेळच्या पावसाळ्यात येथील गॅबियन वॉल कोसळली होती. त्यानंतर, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत काम करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात गॅबियन वॉल ढासळली. त्यामुळे पायथ्यालगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाल्याने तातडीने हे काम थांबवण्यात आले.
त्याशिवाय गॅबियन वॉल कोसळू नये, तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये, यासाठी तेथे प्लास्टिक टाकण्यात आले आहे. मात्र, तरीही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे.पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून ग्रामस्थांच्या शेतात आणि घर परिसरात साचलेला चिखल जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला.
यापूर्वी परशुराम घाटात डोंगर कटाई करताना घाटातील भले मोठे दगड लोकवस्तीत येऊन घराला तडे गेले होते, तर २०२१च्या अतिवृष्टीत घाटातील दरड खाली येऊन एक घर उद्ध्वस्त हाेऊन दोघांना जीव गमवावा लागला होता.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून गॅबियन वॉलचे काम तातडीने थांबवले आहे. पावसाळा संपेपर्यंत या कामावर केवळ देखरेख ठेवली जाणार आहे. पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत तांत्रिकदृष्ट्या काही बदल प्रस्तावित केले जात आहेत. या नवीन रचनेनुसार गॅबियन वॉलचे काम केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग, महाड विभागाचे शाखा अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.