
दीपक भोसले/संगमेश्वर/दि २ जुलै- राज्य शासनाच्या निर्णयानुसार आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिका आता रद्द करण्यात येणार आहेत. गेली काही वर्ष राज्य शासनाच्या अन्न आणि पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांची आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आता ११ जुलैपर्यंत आधार जोडणी करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत आधार जोडणी न केलेली रेशनकार्ड आता रद्द करण्यात येणार आहेत. सध्या आधार जोडणी न झालेली ३ लाख ३ हजार ४५४ रेशनकार्ड आता बंद होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
बनावट शिधापत्रिका तसेच दुबार शिधापत्रिका यामुळे योग्य लाभार्थ्याला शिधापत्रिकेच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांची ओळख पटण्यासाठी शिधापत्रिकेसोबत आधार जोडणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अन्न आणि पुरवठा मंत्रालयाकडून शिधापत्रिकांसोबत आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
गेली २ वर्ष यासाठी प्रत्येक रेशन दुकान तसेच तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र टेबल उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र असे असूनही अनेक शिधापत्रिका धारकांनी अद्याप आधार जोडणी केलेली नसल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ३ लाख ३ हजार ४५४ शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आधार जोडणी केली नसल्याचे समोर आले आहे. यात अंत्योदय अन्न योजनेतील ३४ हजार ९०३ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लाख ६८ हजार ५४७ आणि अन्य ४ शिधापत्रिकांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जर या शिधापत्रिकांची आधार जोडणी झाली नाही तर ही सर्व रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत. अंतिम टप्प्यात आधार जोडणी करण्यासाठी ११ जुलै २०२५ ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ आपल्या जवळच्या रास्त धान्य दुकानात जाऊन आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
- आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिका
तालुका एकूण सदस्य अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना
मंडणगड १२,६५२ १,३९० ११,२६२
दापोली ३४,३५१ २,५२० ३१,८३१
खेड ३०,१८० ३,२५७ २६,९२३
गुहागर १९,४५५ २,४४० १७,०१५
चिपळूण ४९,५३७ ६,८२६ ४२,७११
संगमेश्वर ४३,२८६ ७,६८४ ३५,६०२
रत्नागिरी ५९,६९८ ४,०२७ ५५,६६७
लांजा १६.६१६ २,५३१ १४,०८५
राजापूर ३७,६७९ ४,२२८ ३३,४५१