
रत्नागिरी :- शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल ३५ लाखांची फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत रत्नागिरीतून आवळल्या. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही घटना मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली आहे.
प्रथम जयेश खानविलकर (वय २२ , रा. नाचणे, रत्नागिरी) असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात माजी नगरसेविका शिल्पा सुभाष धुंदूर ( ७५ , रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, संशयिताने फिर्यादी महिलेसह अन्य दोन महिलांना शेअर मार्केट आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्या महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात वेळोवेळी असे एकूण ३४ लाख ८९ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.
दरम्यान, जास्त परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलीस उप निरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले, शरद जाधव यांनी केली.