
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज थांब्याजवळ ट्रकच्या धडकेने मोटारसायकलस्वार शुभम सुधीर पाचांगले (वय २६ वर्षे, रा. बोरज आग्रेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा जखमी झाला . या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची फिर्याद खेड पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी यांनी दाखल केल्यानंतर खेड पोलिसांनी ३० जून २०२५ रोजी संशयित ट्रकचालक महेंद्रकुमार नानकुराम यादव (रा. विरापूर, फत्तानपुर, राणीगंज, राज्य उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित ट्रकचालक महेंद्रकुमार नानकूराम यादव याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. जी.जे.१२ बी. एक्स. ८११३) हा मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेकडे चालवित घेऊन जात असताना संशयित ट्रकचालक यादव याने पाठीमागे न बघता ट्रक रिव्हर्सने खेडच्या दिशेकडे वेड्यावाकड्या परिस्थितीत पाठीमागे घेत असताना महामार्गावरून पाठीमागून चिपळूणच्या दिशेकडे जाणाऱ्या मोटारसायकल (क्र. एम. एच. ०८- बी.ए.५७०८) वरील चालक शुभम सुधीर पाचांगले याला धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार शुभम पाचांगले जखमी झाला आहे.