
राजापूर –⁸ शहरातील जवाहर चौक ते जकातनाका मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी व नागरिक त्रस्त झालेले असताना, हे खड्डे कमी होते की काय म्हणून रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली नगरपरिषदेने कुशे मेडीकल समोरील रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवला आहे. त्यामुळे राजापूर शहरवासीयांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या ठिकाणी रस्ता खोदुन ठेवल्यामुळे व वरच्या बाजुची गटारेही तुंबल्याने य रस्त्याची अवस्था वाहळासारखी झाली आहे .
जवाहर चौक ते जकातनाका रस्त्याचे दोन वर्षापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चुन नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र तीव्र उतार आणि गटारांच्या अभावामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी यामुळे सद्यस्थितीत रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच जवाहर चौकापासून सुपर बझार पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला होता. पावसात मोठा प्रवाह रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्याला वहाळाचे स्वरूप प्राप्त होत होते.
सुरुवातीला रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक, पादचारी व नागरिकांनी नगरपरिषदेविरोधात आवाज उठविण्यास सुरूवात केली. त्यानंतर प्रशासनाने रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली कुशे मेडिकल ते सुपर बझार दरम्यानचा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवला आहे. रस्ता खोदून आता आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. पावसात
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाचे पाणी साचून मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी, पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय दुकानांमध्येही चिखलाचे पाणी उडून नुकसान होणार आहे. त्यामुळे तत्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आमदारांच्या आदेशाला हरताळ
दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. मात्र आता महिन्याभराहून अधिक कालावधी लोटला तरी खड्ड्यांच्या समस्येपासून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. त्यामुळे आमदारांच्या आदेशालाही नगरपरिषदेने हरताळ फासल्याचे दिसत आहे.