
कोकणच्या रंगभूमीला नवा चेहरा देणारी संस्था
महाड : “नाटक कंपनी महाड ही कलासंस्था भविष्यात कोकण आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करेल,” असे उद्गार प्रसिद्ध अभिनेता आणि ‘हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने यांनी काढले. ते महाड येथे नव्याने सुरू झालेल्या नाटक कंपनी महाड या रंगकला संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड, जेम्स फाउंडेशन आणि जीएम प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. २८ जून रोजी अभिनय प्रशिक्षण व लघुपट कार्यशाळेच्या आयोजनाने या संस्थेच्या कार्याचा प्रारंभ झाला.
चिपळूण येथील ‘नाटक कंपनी चिपळूण’ या मूळ संस्थेचीच ही महाड शाखा असून उद्घाटनासाठी ओंकार भोजने स्वतः उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोकणातील तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. “महाडमधील ही संस्था नव्या पिढीतील कलावंतांची घडामोडी घडवेल,” असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
कार्यक्रमाच्या वेळी समाजकल्याण विभागाचे ग्रंथपाल अरुण मोरे, सीईटीपी महाडचे चेअरमन अशोक तलाठी, रंगसुगंध महाडचे संस्थापक सुधीर शेठ, आदर्श शिक्षक सुनील पवार, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, अॅड. संदीप सर्कले, अपूर्वा देसाई, दीपक महाडिक, भाई गोळे, डॉ. कैलास आवटे, योगेश देवघरकर, अमोल सुंभे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर साळवी यांनी तर आभार प्रदर्शन योगेश देवघरकर यांनी केले.