
वरद गोखले याने तालुक्यात पटकावले प्रथम स्थान
सावर्डे : विद्याभारती शैक्षणिक संकुल, शिरळ (चिपळूण) यांच्या वतीने राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भूगोल प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील सातवीतील विद्यार्थी वरद अभय गोखले याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले.
ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये पार पडली. गोखले याच्यासह विद्यालयातील एकूण सात निवडक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भूगोल विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच भौगोलिक संकल्पना दृढ व्हाव्यात या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला.
भूगोल हा शालेय अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पण तुलनेने दुर्लक्षित विषय आहे. मात्र, या विषयाच्या अभ्यासातून अर्थशास्त्र, राजकारण, पर्यावरण, युद्धशास्त्र, परराष्ट्रीय संबंध, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. याच विषयाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
वरद गोखले याला या यशासाठी विद्यालयातील भूगोल शिक्षक सुखदेव म्हस्के, शिक्षिका सौ. अपर्णा डिके व सौ. सिद्धी सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.