
चिपळूण, मांडकी-पालवण- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी- पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी ‘महाराष्ट्र कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते, स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. कृषी क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय यामुळे त्यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.
एक दूरदृष्टीचे नेते आणि कृषी क्षेत्राचे कैवारी वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथे झाला होता. ते १९६३ ते १९७५ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या १२ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या कृषी विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दुष्काळ निवारण, सिंचन प्रकल्पांना चालना, कृषी विद्यापीठांची स्थापना, आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रचार यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली. त्यांना महाराष्ट्राच्या ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते.
आजही महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अनियमित पाऊस, वाढते उत्पादन खर्च, आणि बाजारभावातील अस्थिरता यांसारख्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. मात्र, शासन आणि कृषी संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृषी दिनानिमित्त हेच आवाहन केले जाते की, सर्वांनी मिळून शेती क्षेत्राला अधिक सक्षम आणि टिकाऊ बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.
कृषी दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. महाविद्यालयाच्या शेतावर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.