
चिपळूण, ता. ३० : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. महाविद्यालयात ‘स्त्रीशक्ती’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या संरक्षण अधिकारी श्रीमती माधवी जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती जाधव यांचा प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट मधुसूदन माने यांनी केले. मेजर नम्रता माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत सुत्रसंचालन केले.
स्त्री सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना श्रीमती जाधव म्हणाल्या, “संघर्ष, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर महिलांनी समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मुलींनी हे लक्षात घ्यायला हवे की समाजात अनेक गोष्टी अशा असतात ज्या त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहून आत्मविश्वासाने वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.”
या वेळी उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, प्रा. तृप्ती यादव, प्रा. दिशा दाभोलकर, प्रा. उज्ज्वला कुलकर्णी, प्रा. शुभांगी इंगळे, प्रा. विठ्ठल कोकणी, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन व १९ महाराष्ट्र बटालियनचे छात्र, मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने यांची उपस्थिती होती.