रत्नागिरी : शिमगोत्सवानिमित्त काही दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लुटमार होत असल्याची माहिती समोर येत होती. यानंतर आरटीओ कार्यालयाकडून यासंदर्भात कडक धोरण अवलंबण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर विशेष मोहीम राबवत विविध प्रकारात एकूण ४५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांनी दिली आहे.
सध्या रत्नागिरीत गावापासून ते शहरापर्यंत शिमगोत्सवाची धामधूम आहे. कोकणासह रत्नागिरीत गणेशोत्सव व होळी या २ सणांना प्रचंड प्रमाणात चाकरमानी रत्नागिरीत गर्दी करतात. मात्र यावेळी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे प्रवाशांना सांगितले जात होते. यामुळे याबाबत आरटीओने लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती.
उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत अधिकृत दरपत्रक तसेच तक्रार निवारणासाठी दूरध्वनी क्रमांकाबाबतचे जनजागृती फलक रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. जेणेकरून येणार्या प्रवाशांना योग्य भाडे समजू शकण्यास मदत होईल.
याशिवाय होळी सणानिमित्त येणार्या प्रवासी वाहनांवर परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेले रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन करणारे स्टिकर्स देखील लावण्यात येत आहेत. दरम्यान आरटीओच्या या मोहिमेबाबत प्रवाशांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी जयंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला.
जाहिरात :