चिपळूणात पूरस्थिती मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,एनडीआरएफची प्रभावी प्रात्यक्षिके…

Spread the love

*चिपळूण-* चिपळूण शहरात आज शनिवारी ‘पूरस्थिती मार्गदर्शन शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. उपविभागीय कार्यालय चिपळूण, तहसील कार्यालय चिपळूण, चिपळूण नगर परिषद आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.

शिबिरात आपत्ती परिस्थितीमधील प्रतिबंधात्मक उपाय, बचाव कार्यपद्धती आणि पूरप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांविषयी सखोल माहिती देण्यात आली. या मार्गदर्शन शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. याप्रसंगी तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर तसेच एनडीआरएफचे कमांडर प्रमोदकुमार राय हे मान्यवर उपस्थित होते. कमांडर राय यांनी उपस्थितांना पूर परिस्थितीतील धोके, काळजी घेण्याच्या उपाययोजना, स्थानिक प्रशासनाची भूमिका तसेच सामूहिक सहभागाचे महत्त्व विषद करत अत्यंत सखोल मार्गदर्शन केले.

एनडीआरएफचे शरद साखरे यांनी पूरस्थितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची माहिती दिली. त्यांनी लाइफ जॅकेट्स, रेस्क्यू रोप्स, इन्फ्लेटेबल बोटी, प्राथमिक उपचार साहित्य यांविषयी प्रत्यक्ष दाखवून माहिती दिली. यानंतर जलतरण तलाव परिसरात एनडीआरएफच्या पथकाने विविध आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्याची प्रात्यक्षिके सादर केली. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला मदत, बुडणाऱ्याचा बचाव, जलप्रलयानंतर शोध कार्य अशा अनेक दृश्यांनी उपस्थित नागरिक भारावून गेले. विशेष म्हणजे, काही नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.

या शिबिरात एनडीआरएफचे सतीश देसाई, हनुमान बर्डे, सचिन मोरे, रवींद्र पवार, सतीश ढोबळ, तंबोली अकबर, राजेंद्र घोणके हे अधिकारी व जवान सक्रिय सहभागी झाले होते. कार्यक्रमास ग्लोबल चिपळूण टुरिझमचे विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, आशुतोष जोगळेकर, प्रभाकर चितळे, समीर कोवळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. शिबिराचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये आपत्ती परिस्थितीतील सजगता वाढवणे, आपत्कालीन यंत्रणांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक समन्वय बळकट करणे हे होते. पूर आणि नैसर्गिक आपत्ती चिपळूण परिसरात वारंवार भेडसावत असल्याने अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण नगर परिषद व प्रशासनाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page