
चिपळूण, २१ जून २०२५ | प्रतिनिधी: शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुकुल विभागात जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र, सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त अशा ‘संगीत कक्षाचे’ उद्घाटन आज दिमाखात पार पडले. कै. श्रीकृष्ण चिंतामण (आप्पासाहेब) दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात परशुराम पूजनाने झाली. युनायटेड एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मानवंदनेनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. गुरुकुल विभागाच्या दुसऱ्या मजल्यावरील संगीत कक्षाचे उद्घाटन कै. आप्पा दांडेकर यांचे भाचे श्री. संतोष दांडेकर, ज्येष्ठ अर्थसल्लागार श्री. जयंतराव विद्वांस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व सरस्वती वंदनेनंतर संपन्न झाले.
नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या या संगीत कक्षात पारंपरिक वाद्यांसोबतच आधुनिक वाद्यांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये पायपेटी, संवादिनी, तबला, पखवाज, तसेच सिंथेसायझर, क्लॅप बॉक्स, जेम्बे, काँगो यांचा समावेश आहे. उद्घाटन प्रसंगी सौ. सीमाताई विद्वांस यांनी पायपेटी वादन सादर करून संगीतकक्षाचा अनुभव समृद्ध केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सुरेल सरस्वती स्तवन व स्वागत गीत सादर केले. यानंतर संस्थेचे विश्वस्त श्री. धनंजय चितळे यांनी प्रास्ताविक करून संगीत शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. कै. आप्पा दांडेकर यांचे दीर्घ सहवास लाभलेले श्री. मनोहर केळकर यांनी त्यांच्या आठवणी सांगताना भावुक वातावरण निर्माण केले. कै. आप्पांच्या संघ समर्पित जीवनावर आधारित संग्रहित ध्वनीचित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली.
प्रमुख पाहुणे श्री. जयंतराव विद्वांस यांनी देणगी देण्यामागील प्रेरणा उलगडत सांगितली. “संगीत शिक्षणाच्या गरजेची जाण ठेवून योग्य कारणासाठी या निधीचा वापर झाल्याचे समाधान आहे,” असे ते म्हणाले.
मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध सर यांनी विद्यार्थ्यांमधील सांगीतिक प्रतिभेला चालना देण्यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुधीर अभ्यंकर, श्री. साईनाथ कपडेकर, श्री. रवींद्र करंदीकर, उपकार्याध्यक्ष श्री. राजीव कानडे, सहकार्यवाह श्री. विजय चक्रदेव, तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य पराग भावे, तुषार गोखले, सुनील जोशी, वैशाली निमकर, इतर शाळांचे मुख्याध्यापक, पालक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. अभय चितळे यांनी कार्यक्रमाचा समारोप करत सर्व मान्यवरांचे, दांडेकर कुटुंबीयांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.