
हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यापासूनच सणांना सुरुवात होते. यंदा ‘वट पौर्णिमा’ (Vat Savitri Purnima) कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया…..
धर्म/ ज्योतिष-‘वट पौर्णिमेला’ हिंदू धर्मात खूप महत्व आहे. हा सण प्रत्येक महिलेसाठी खास असतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. त्यामुळं सुवासिनींसाठी वट पौर्णिमेचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ही घटना ज्यादिवशी घडली त्यादिवशी पौर्णिमा होती. त्यादिवसापासून सुवासिनी महिला पतीच्या प्राणांचं रक्षण व्हावं आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळं वडाच्या झाडाची पूजी केली जाते.
वट पौर्णिमा शुभ तारिख काय?
यंदा वट पौर्णिमा १० जूनला साजरी केली जाणार आहे. सकाळी ११:३० वाजता वट पौर्णिमेच्या पूजाला सुरुवात होईल. दूसऱ्या दिवशी ११ जूनला दुपारी १:१३ मिनिटांनी तिथी संपणार आहे. तर वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११:५५ वाजल्यापासून दुपारी १२:५१ वाजेपर्यंत ब्रम्ह मुहूर्त आहे. यावेळेत पूजा करावी.
काय आहे वटवृक्षाचं महत्त्व?
वटवृक्ष हे शुभ मानलं जातं कारण त्यात देवताचे निवास मानले जाते. त्यामुळं वडाला सात फेऱ्या मारल्यानं पतीला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते, असा समज आहे.
सात फेऱ्यांचं काय महत्त्व ?
सात फेऱ्या मारणं हे सात जन्मांमधील एकनिष्ठतेचे प्रतीक मानलं जातं. या फेऱ्या मारताना, महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्मासाठी एकच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात.
वट पौर्णिमा पूजेचे साहित्य
वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी उठावे. त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी. नंतर वट पोर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी. यासाठी कुंकू, सिंदूर, फळे, फुले, चंदन, अक्षता, दिवा, गंध, अत्तर, धूप, रक्षासूत्र, कच्चे सूत, वडाचं फळ, बांबूचा पंखा, पाण्याने भरलेला कलश, नारळ, मिठाई, सत्यवान, देवी सावित्रीची मूर्ती, लाला कापड, धागा हे सामान लागेल. पूजेदरम्यान लाल, हिरवी साडी नेसावी. या दिवशी उपवास करणं शुभ मानलं जातं.
वट पौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत
वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करुन साजशृंगार करावा. त्यांनंतर श्री गणेशाची स्थपणा करावी. नंतर त्यावर हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करून त्याची पूजा करावी. पुढे आपण घेतलेले सुतबंडल वटवृक्षाला गुंडाळत सातवेळा प्रदक्षिणा घालावी. त्यांनंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. ओटी भरुन पंचामृत, नाणी, फुले, पाच फळे अर्पण करावी. त्यानंतर वटवृक्षाला हळदी-कुंकू अर्पण करून नैवेद्य आणि आंबे अर्पण करा. पाच विवाहितांना हळदी-कुंकू लावत त्यांची ओटी भरावी. ओटीमध्ये गहू आणि फळे घालावे. सायंकाळी सावित्रीच्या कथेचं वाचन करावे.
वट सावित्री व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, पूर्वी राजर्षी अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. सावित्री देवीच्या कृपेने त्यांच्या घरी मुलगी झाली. या मुलीचं नाव होतं ‘सावित्री’. सावित्रीने सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला. पण आपला पती अल्पायुषी आहे हे नारदजींनी तिला सांगितल्यावरही सावित्रीनं आपला निर्णय बदलला नाही. आपलं सर्व राजवैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहायला गेली. कारण सत्यवानाचे वडील वनराज होते. एके दिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचा प्रवासाचा दिवस आला, तो जंगलात लाकूड तोडायला गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला. त्यावेळी यमराजजी त्याचा प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीला हे कळलं आणि तिनं तीन दिवस उपवास केला. तिनं यमराजाला सत्यवानाला मारू नये म्हणून प्रार्थना केली पण यमराजाने तिचं ऐकलं नाही. परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमराजाच्या मागे लागली, यमराजाने तिला अनेकवेळा यापासून परावृत्त केलं. पण ती आपल्या पतीसाठी त्याचा पाठलाग करत राहिली. सावित्रीचं धैर्य पाहून यमराजाने तिला तीन वरदान मागायला सांगितले.
यमराजने दिले तीन वरदान
सावित्रीने यमराजाकडं वरदान मागितलं की, माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत, त्यांना दृष्टी द्या. यमराज म्हणाले की, हे होईल पण आता तू परत जा. पण तरीही सावित्री यमराजाला जावू देत नव्हती. त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितलं. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्याचे राज्य हिरावून घेतलं आहे, ते त्यांना परत मिळावं. यमराजानेही सावित्रीला हे वरदानही दिलं. पण त्यानंतरही सावित्री यमराज आणि त्यांचे पती सत्यवान यांच्यामागे लागली. तेव्हा यमराजांनी तिला तिसरं वरदान मागण्यास सांगितलं. यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितलं. यमराजानेही सावित्रीला हे वरदान दिलं. अखंड सौभाग्याचं वरदान देऊन यमराज तेथून निघून गेले. त्यावेळी सावित्री आपल्या पतीसोबत वटवृक्षाखाली बसली होती. त्यामुळं महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात.