
रत्नागिरी :* जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी 2 मधील पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 मध्ये आणले जाणार आहेत. त्याठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाऐवजी पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले आहे. जिल्हापरिषदेअंतर्गत असलेले 67 दवाखाने श्रेणी 2 मधून 1 मध्ये वर्ग होणार आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकार्यांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.
ही पदे परिपूर्ण झाली तर नव्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पशुंवर उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकार्यांची उणिव जाणवणार नाही. जिल्हापरिषद पशू विभागाजे तालुकास्तरावर सहा चिकित्सालयं आणि ग्रामीण भागात 67 दवाखाने आहेत. तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी नियुक्त आहेत. तर पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे अधिक असल्यामुळे या दवाखान्यांचा कारभार रामभरोसेच आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना वेळेत उपचार देण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा जनावरे मृत पडण्याची भिती असते. काही वेळा शेतकरीच स्वतःहून उपचार करतात.
शासनाकडून पशुधन विकास अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्यात 2 हजार 795 पदे भरली जाणार आहेत. त्यातील जिल्हापरिषदेसाठीची 67 आणि राज्य शाससनाच्या 80 दवाखान्यांसाठी मिळून 147 पशुधन विकास अधिकारी मिळावेत, अशी मागणी पशू विभागाकडे करण्यात आली आहे. ही पदे भरली गेली तर ग्रामीण भागातील शेतकर्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी तसेच पशुपालकांची मोठी अडचण दूर होणार आहे.
“नवीन बदलानुसार आवश्यक रिक्त पदे भरली जावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ती पदे भरली गेली तर निश्चितच ग्रामीण भागातील प्रश्न सुटणार आहेत.” -आर. पी. नरूटे, पशुधन विकास अधिकारी