
सातारा : जिल्ह्यात कोरोनाने तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढले असून, यंदाचा कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका ७० वर्षीय वृद्धेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी दुपारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधित महिला सातारा शहरातील उपनगरात राहणारी होती.
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तीन रुग्ण कराड येथे, तर एक महिला रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. संबंधित ७० वर्षीय वृद्धेवर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान शनिवारी दुपारी त्या वृद्धेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेला काही वर्षांपूर्वीसुद्धा कोरोना झाला होता. दुसऱ्यांदा त्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्या महिलेला डायबेटिस आणि फुफ्फुसाचा आजारही होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी सांगितले.
कराड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
जिल्हा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व औषधे उपलब्ध आहेत. तसेच २० खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभागही तयार करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.