
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमची भाषा मराठी असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मीरा-भाईंदर मध्ये प्रवेश केला तर मी फक्त हिंदीच बोलतो, असे देखील सरनाईक यांनी म्हटले आहे. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच बाजूंनी टीका होत आहे.
या संदर्भात ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने देखील प्रताप सरनाईक यांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे. हिंदी पत्रकारिता दिवसाच्या निमित्ताने ‘मुंबई हिंदी पत्रकार संघा’तर्फे आयोजित केलेल्या हिंदी सेवा सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो. पण आमच्या तोंडी कधी हिंदी तर कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. माझ्या मतदारसंघात मी मराठीतच बोलतो. मात्र जेव्हा मीरा-भाईंदर येथे जातो, तेव्हा हिंदी बोलतो. मराठी आमची मातृभाषा, आमची माय असे आम्ही म्हणत असतो. पण हिंदी ही आपली लाडकी बहीण आहे, असे देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांची टीका…
दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता यावे आणि मराठी माणसाला आणि मराठी भाषेला सन्मान मिळावा यासाठी शिवसेनेची स्थापना केली आहे. आता स्वर्गीय बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणारे मराठी बाबत काय भूमिका मांडत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही त्यांची भूमिका नसून भाजप आणि अमित शहा यांची भूमिका असल्याचे ते म्हणाले. अमित शहा हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शहा यांना जे हवे तेच प्रताप सरनाईक बोलत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.