
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्यावर्षी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, नंतरच अयोध्येत यावं. नाहीतर त्यांना विरोध केला जाईल, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतलेली. मध्यंतरी बृजभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांनिमित्ताने महाराष्ट्रात येऊन गेले. या दरम्यान मनसे आणि बृजभूषण यांच्यातील वाद मिटला अशी चर्चा रंगलेली. पण मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांचं नाव न घेता त्यांना जबरदस्त टोला लगावला.
तुमचं हिंदुत्व म्हणजे नुसती जपमाळ असते का? प्रत्यक्ष कृतीतून तर कधी दिसत नाही. मला अयोध्येला बोलावलं, पण विरोध करणारे हिंदुत्त्ववादीच. आतलं राजकारण मला कळलं म्हणून मी गेलो नाही. मग ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं काय झालं पुढे? म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना लगावला. बृजभूषण सिंह यांच्यावर देशाच्या दिग्गज महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरुनही पायउतार व्हावं लागलं आहे. त्याच गोष्टीचा धागा पकडत राज ठाकरेंनी नाव न घेता निशाणा साधला.