
रत्नागिरी : शहरातील मच्छी मार्केट रिक्षा स्टँडजवळ बुधवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका मेकॅनिकला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमली पदार्थांच्या विक्रीवरून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणी तिघा अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत आलमगीर शफीक वागळे (वय-२९, व्यवसाय- मेकॅनिक, रा. निळकंठ अपार्टमेंट, मच्छी मार्केट, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आलमगीर वागळे आणि त्यांचे मित्र मस्तान शेख व शान नागवडे हे मच्छी मार्केट रिक्षा स्टँडजवळ गप्पा मारत उभे होते. तेव्हा अचानक महमंद कैफ (पूर्ण नाव माहीत नाही), बिलाल शेख (पूर्ण नाव माहीत नाही) आणि दानियाल शेख (सर्व रा. मच्छी मार्केट, रत्नागिरी) हे तिथे आले. आरोपी महमंद कैफ याने जवळ येऊन तुम्ही माझा मित्र अदनान नाखवा याला अमली पदार्थ विकू नको म्हणून धमकी देता का ? असे विचारले. त्यानंतर त्याने हातातील मोटारसायकलच्या चावीने आलमगीर वागळे यांच्या डाव्या डोळ्यावर, मानेवर आणि बरगडीवर मारहाण केली. दरम्यान, आरोपी बिलाल शेख याने तेथील दगड उचलून फिर्यादीच्या बरगडीवर मारून दुखापत केली, तर आरोपी दानियाल शेख याने आलमगीर वागळे यांना हाताच्या ठोशाने मारहाण केली. या घटनेनंतर आलमगीर वागळे यांनी सायंकाळी ७.५८ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अमली पदार्थांच्या विक्रीवरून हा हल्ला झाला का, याचाही शोध घेण्यात येत आहे.