
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी राबोडी परिसरातील नाल्यांची पाहणी असता पुलाच्या बांधकामांचा राळारोडा नाल्यात टाकल्यामुळे खाडी आणि नाल्यामधील सामाईक ओढा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. त्यानंतर ठाणे महानगर पालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळेच नालेसफाईचे तीन तेरा वाजले असून ठाणेकरांचा कराचा पैसा कळव्याच्या खाडीत वाहून जात आहे, अशी टीका डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. या पाहणीच्या वेळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला हे नाल्यावर आव्हाडांच्या समोर येऊन त्यांना आव्हान देऊ लागल्याने वातावरण तापले होते.
अवकाळी पावसामुळे राबोडीच्या क्रांतीनगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. नाल्यावर बांधला जात असलेला पूल आणि त्याचा राळारोडा नाल्यात टाकल्याने ही पूरस्थिती निर्माण झाल्याने त्याची पाहणी करण्यासाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह राबोडी परिसरात गेले होते.
या नाल्याची आणि त्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम पाहून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, विद्युत रोषणाईचा ठेका ज्या एसएमसी कंपनीला देण्यात आला होता. त्याच कंपनीला ह्या बांधकामाचेही कंत्राट देण्यात आले आहे. नाल्यावरील स्लॅबचे बांधकाम करताना वापरण्यात येणाऱ्या सळईंवर रासायनिक प्रक्रिया करायची असते. मात्र, ती न केल्याने आताच सळयांना गंज लागला आहे. भविष्यात होणाऱ्या आपत्तीची जबाबदारी कोण घेणार आहे का? त्यामुळेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी गेले होते त्यांना ठामपाने भरपाई द्यावी. तसेच, नाल्यामुळे विस्थापित झाल्याचे दाखवून बीएसयूपीमध्ये कोणाला घरे दिली गेली, याचाही हिशोब जाहीर करावा, अशी मागणी केली.
आव्हाड पाहणी करीत असताना नजीब मुल्ला हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि निधी आणायला काय करावे लागले ते मलाच माहिती,आव्हाडांना पहिले बोलू द्या मग मी त्याला प्रतिउत्तर देतो असे मुल्ला हे माध्यम प्रतिनिधींना बोलू लागले. तर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना नजीब मुल्ला यांनी शांत केले. हा प्रकार पाहून.आव्हाड आवक झाले तर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घातला होता.
याप्रसंगी राजेश खारकर, राजेश कदम, राजेश साटम, अंकुश मढवी, संजीव दत्ता, रचना वैद्य, शिवा यादव, दिगंबर गरुड, एकनाथ जाधव, संदीप यादव , सुरेश सिंह, मयूर पाटील , मयुर पगारे, गणेश मोरे, संदीप क्षीरसागर , जयेश पाटील, बंटी मोरे, राहुल पाटील, प्रशांत मोरे यांच्यासह शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.