
पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहे. यातच आता अमरावतीतही विवाहितेने पतीच्या जाचामुळे स्वत:ला संपवले आहे….
अमरावती : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहे. यातच आता अमरावतीतही विवाहितेने पतीच्या जाचामुळे स्वत:ला संपवले आहे. अमरावतीतील ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेचा पती बँकेत मॅनेज पदावर कामाला आहे.
शुभांगी निलेश तायवाडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती हेल्थ ऑफिसर म्हणून काम करत होती. तर तिचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर काम करत आहे. चार वर्षांपूर्वी शुभांगी आणि निलेशचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच निलेशने शुभांगीचा छळ सुरू केला. या जाचामुळेच तिने आत्महत्या केली आहे, असा आरोप शुभांगीच्या माहेरच्यांनी केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिला तिचा पती निलेशनेच फासावर लटकवले आहे, असा गंभीर आरोप शुभांगीचे कुटुंबीय करत आहे. शुभांगीला एक तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाची मुलगी अशा दोन मुली आहेत.
शुभांगीच्या माहेरच्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या वडिलांनी सांगितले की, आठ दिवसांपूर्वीच आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती. तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट द्या असे जावई म्हणाला. माझी मुलगी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे, ती असं करुच शकत नाही. जावयानेच तिला फासावर लटकवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पती निलेश तायवाडे आणि सासूला अटक केली आहे. गाडगे नगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. कुटुंबीयांनी मात्र शुभांगीला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.