कल्याण : मध्य रेल्वेच्या कसारा-उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्ग खचून खड्डा पडल्याने कसाराकडून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली. त्यामुळे कसाराकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल, मेल एक्सप्रेस अर्धा तास कसारा, उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या अलीकडे थांबवून ठेवण्यात आल्या.
कसाराहून मुंबईकडे जाणारी अतिजलद लोकलचा यामुळे खोळंबा झाला. कसारा-उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उंचवट्यावर असलेल्या रेल्वे मार्गा लगतचा काही भाग खचून मोठा खड्डा पडला. यामुळे रेल्वे मार्गाला धोका निर्माण झाला होता. दोन्ही रेल्वे स्थानकांवरील अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन कामगारांना पाचारण केले.
खचलेल्या भागाच्या ठिकाणी खडी, मातीचा भराव टाकून खड्डा भरुन काढण्यात आला. मार्गाला धोका नसल्याची खात्री पटल्यावर अर्धा तासाने कसारा-सीएसएमटी मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली, अशी माहिती कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी दिली.
सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांचा रेल्वे स्थानकांवर खोळंबा झाला. कसारा परिसरातून मुंबईत सकाळच्या वेळेत दूध, भाजीपाला विक्रेते जातात. सकाळच्या कसारा लोकलेने त्यांना वेळेत मुंबईत गेले तर दूध वितरण आणि भाजीपाला विक्री करता येते. उशीर झाला तर भाजीचे पाव पडतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. दूध टाकण्यास विलंब झाला तर दुधाची नासाडी होते, असे दूध विक्रेत्याने सांगितले.
कल्याणनंतर कसारा लोकल अति जलद लोकल असते. त्यामुळे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर पासुनचे प्रवासी या लोकलवर अवलंबून असतात. वंदे भारत एक्सप्रेस पुढे काढण्यासाठी गोरखपूर एक्सप्रेस काही वेळ खर्डी रेल्वे स्थानकात एका मार्गिकेत थांबून ठेवण्यात आली होती. वंदे भारत एक्सप्रेस गेल्यावर गोरखपूर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
जाहिरात :