
*सोलापूर-* सोलापूरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये उस्मान मन्सूर यांच्या कुटुंबातील तब्बल चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. उस्मान मन्सूर यांच्या नातवाने या दुर्घटनेमध्ये जीव गमावला आहे.
रात्री तीनच्या सुमारास टॉवेल कारखान्याला आग लागली तेव्हा मन्सूर कुटुंब हे दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. आग लागली त्यावेळेस एक वर्षांचा युसूफ हा आईच्या जवळ झोपला होता. मात्र आगीचा तांडव वाढल्यामुळे जीव वाचवण्यासाठी मन्सूर कुटुंबीय एका खोलीतून बाथरूम मध्ये जाऊन लपले होते, त्यावेळेस आईच्या कुशीत एक वर्षाचा युसुफ विसावला होता.
मन्सूर कुटुंबीयांनी एक वर्षांच्या युसुफला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र आग ही काळ बनून आल्यामुळे एक वर्षाच्या चिमुकलेला आपला जीव गमवावा लागला. युसुफबरोबरच त्याच्या आईलाही प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून जेव्हा आग आटोक्यात आणण्यात आली आणि मृतदेहांचा शोध सुरू झाला त्यावेळेस आईच्या कुशीत एक वर्षाचं चिमुकलं दिसून आलं, यामुळे अग्निशमन दलातील जवानही काही वेळा पुरते भावनिक झाले होते.