मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग,अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण…

Spread the love

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, रत्नागिरी नगरपालिकेच्या आणि फिनोलेक्स कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

ही घटना बुधवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता मिऱ्या-अलावा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अलावा येथील एका व्यक्तीने झाडाजवळ सुकलेला पालापाचोळा जमा केला होता. हा कचरा जाळत असताना आगीची ठिणगी बाजूला असलेल्या एका जुन्या झाडाच्या सुक्या बुंध्याला लागली. बघता बघता, झाडाच्या आतल्या बाजूला असलेल्या सुकलेल्या पोकळ फांद्यांमध्ये आग भडकली आणि त्यातून धूर आणि ज्वाला बाहेर येऊ लागल्या.

एका ओल्या झाडाच्या फांद्यांमध्ये आग लागल्याचे विस्मयकारक दृश्य पाहून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आजूबाजूला लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी त्वरित रत्नागिरी पालिका आणि फिनोलेक्स अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात जवानांना यश आले. ओल्या झाडाच्या कवेत असलेल्या सुकलेल्या फांद्यांमधून आग बाहेर पडत असल्याने हे दृश्य अधिकच वेगळे दिसत होते. झाडाच्या तीन वेगवेगळ्या फांद्यांतून आग बाहेर पडत होती, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव होण्याची शक्यता टळली आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. या घटनेमुळे नागरिकांनी कचरा आणि पालापाचोळा जाळताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page