
बुलढाणा : शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार आणि माजी प्रशासकीय अधिकारी सिद्धार्थ खरात (Siddharth Kharat) हे एका लग्न समारंभात तलवार हातात घेऊन डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
हा प्रकार बुधवारी चिखली तालुक्यातील अमडापूर येथे पार पडलेल्या विवाह समारंभात घडला. या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळातही या वर्तनावर तीव्र टीका होत आहे.
भारतीय शस्त्र कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करण्यास बंदी आहे. यामुळे अमडापूर पोलीस ठाण्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरात हे पूर्वी प्रशासकीय सेवेत अधिकारी होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले. त्यामुळे “शिस्तीचा आदर्श” मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडूनच कायद्याचे उल्लंघन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यापूर्वीही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.आता आमदार सिद्धार्थ खरात यांचाही तसाच प्रकार समोर आल्यानंतर पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात यांच्या विरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि संबंधित व्हिडिओ पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.