
नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बालपणातील आठवणींना त्यांचे काका वसंतराव गवई आणि बालमित्र रुपचंद खंडेलवाल यांनी बोलताना उजाळा दिला.
अमरावती- न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्यांचं कुटुंब हजर राहिलं. अमरावती शहरातील फ्रेजपुरासारख्या झोपडपट्टी परिसरात नगरपरिषदेच्या शाळेत वर्गात जमिनीवर बसून प्राथमिक शिक्षण घेणारे भूषण गवई हे आज न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. असं असलं तरी ते कायम तळागाळातल्या व्यक्तीला आपले मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे काका वसंतराव गवई आणि बालपणीचे रुपचंद खंडेलवाल यांनी बोलताना काही आठवणी सांगितल्या आहेत.
असं होतं बालपण
गवई कुटुंब हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या दारापूर या छोट्याशा गावातील आहे. २४ नोव्हेंबर १९६० रोजी जन्मलेले भूषण गवई यांचं बालपण मात्र अमरावतीत गेलं आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल राहिलेले दिवंगत रा. सु. गवई यांनी सुरुवातीच्या काळापासून आंबडकरी चळवळीत काम केलं. त्यांच्या आई कमलताई गवई या अमरावतीच्या महेश्वरी कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यावेळी मिळणाऱ्या ६७ रुपये पगारावर त्यांचं घर चालत असे. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या काकांवर मुलांचा सांभाळ करणं, आजारपणात त्यांची देखभाल करणं, ही जबाबदारी होती.
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा …
नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षण-भूषण गवई हे पाच वर्षांचे झाल्यावर फ्रेजरपुरा परिसरात असणाऱ्या घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत मीच भूषण साहेबांना प्रवेश देण्यासाठी गेलो होतो. रामटेके आडनावाच्या मुख्याध्यापिका त्या शाळेत होत्या, असं वसंतराव गवई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. पुढे इयत्ता पाचवीत अमरावती शहरातील ज्ञानमाता विद्यालयात त्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी गेलो. दहावीनंतर पुढचं शिक्षण न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबईत घेतलं, असंदेखील वसंतराव गवई यांनी सांगितलं.
सुख-दुःखाचे प्रसंग-
न्यायमूर्ती भूषण गवई हे प्राथमिक शिक्षण घेत असताना एकदा ते फार आजारी पडले. त्यावेळी जवळ आई, वडील दोघंही नसताना काका म्हणून मी घाबरलो. त्यावेळी सायकल रिक्षातून जवाहर गेट परिसरात असणाऱ्या आमचे फॅमिली डॉक्टर असलेले डॉ. बेंद्रे यांच्याकडं त्यांना घेऊन गेलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, जर वेळ झाला असता तर काही प्रकार घडू शकला असता. आम्ही घरी आल्यावर दादासाहेबांना भूषण यांच्या आजाराबाबत कळलं. त्यावेळी त्यांनी मी केलेल्या कामाबाबत शाबासकी दिली, असं वसंतराव गवई यांनी सांगितलं.
आमच्या कुटुंबाचं ‘भूषण’च-
२४ नोव्हेंबर १९६० रोजी दादासाहेब गवई यांना पहिला मुलगा झाला. तो क्षण आमच्या कुटुंबातला अतिशय आनंदाचा क्षण होता. मुलाचं नाव काय ठेवायचं, याची मोठी चर्चा झाली. पण, दादासाहेबांनी स्वतः त्यांचं ‘भूषण’ हे नाव ठेवलं. भूषण नाव ठेवताच सर्वांना आनंद झाला. आमचे वडील म्हणायचे, हा आपलं नाव ‘भूषण’ करेल. आज आमचा मुलगा हा केवळ गवई कुटुंबाचा, केवळ अमरावतीचा नव्हे तर संपूर्ण देशाचा ‘भूषण’ ठरल्याचा आनंद वसंतराव गवई यांनी व्यक्त केला.वकील होणं हे आजोबांचं स्वप्न- “दादासाहेब गवई यांनी आपल्या राजकीय कार्यातून नाव मोठं केलं. न्यायमूर्ती भूषण यांनी कायद्याचा अभ्यास करून स्वतःचं नाव कमावलं. खरं तर हा मुलगा वकील व्हावा, असं आमच्या वडिलांना वाटायचं. माझा आजोबांची इच्छा मी पूर्ण करेन, असं भूषण लहानपणीपासूनच म्हणायचा. उत्तम वकील होणं, हे आजोबांचं स्वप्न त्यांनी योग्य दिशा पाहून गाठलं. मुंबई उच्च न्यायालय, अमरावती न्यायालय, पुढे नागपूर उच्च न्यायालयात सरकारी वकील त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर काम केलं. पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि आज देशाचे सरन्यायाधीश अशी मोठी झेप न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली. याचा सार्थ अभिमान वाटतो,” असं वसंतराव गवई म्हणाले.शाळकरी मित्रानं व्यक्त केला आनंद- फ्रेजपुरा परिसरात आम्ही लहानपणी शेजारी राहायचो. तिथेच असणाऱ्या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकलो. आज आमच्या बरोबर शाळेत जमिनीवर टाकलेल्या चटईवर बसून शिक्षण घेणारा आमचा मित्र देशाचा सरन्यायाधीश होतोय, याचा मोठा आनंद वाटत आल्याची भावना न्यायमूर्ती भूषण गवई यांचे बालमित्र रुपचंद अग्रवाल यांनी व्यक्त केली. लहानपणी होता तसाच त्यांचा नम्र स्वभाव आजही आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती न्यायालयात सेवकाच्या आईच्या निधनाची बातमी भूषण गवई यांना नागपुरात कळाली. तेव्हा त्यांनी मला फोन करून त्या सेवकाकडं जायला सांगितलं. त्याला कुठलीही मदत हवी असेल तर करायला सांगितली. असं अगदी लहान व्यक्तीबद्दलही आपुलकी जपणारा आमचा मित्र इतका मोठा झाला, याचा आम्हाला अभिमान आहे, असं रुपचंद खंडेलवाल म्हणाले.