आमच्या तिघांत आता स्पीड ब्रेकरला जागा नाही:देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा…

Spread the love

मुंबई- आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता आमच्या तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा दावा केला आहे. आता तर आम्ही तिघे एकत्र आहोत. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही सर्व कामे करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणीही मनात शंका बाळगून नये. आमचा आता डेव्हलपमेंट हा एकच अजेंडा असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मेट्रो 9 चा मीरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्यांना फायदा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मार्ग-9 वर दहिसर (पूर्व) ते काशीगाव या मेट्रोची तांत्रिक तपासणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण होत आहे. या मेट्रो 9 चा मीरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्यांना खूप फायदा होईल. हा टप्पा काशीगाव ते दहिसर पर्यंत आहे. आम्हाला अखंड कनेक्टिव्हिटी मिळवायची आहे. एमएमआर प्रदेशात पहिल्यांदाच दुहेरी चेंबर पूल देखील बांधण्यात आला आहे. मेट्रो आणि रेल्वे पूल एकाच रचनेत दिसतील. यामुळे मोठी वाहतूक कोंडी कमी होईल. हे विरारपर्यंत वाढवले ​​जाईल. सर्व मेट्रो एकमेकांशी जोडल्या जात आहेत. आम्ही आता जलद गतीने काम करू. ही सर्व कामे 2027 च्या अखेरीस पूर्ण होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

स्थगिती सरकारच्या काळात प्रकल्पाला ब्रेक लागला होता – एकनाथ शिंदे….

मेट्रो प्रकल्पाच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आंदोलन करावे लागले होते. मात्र, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळात आम्हीदेखील मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी या मेट्रोला मान्यता मिळाली. 2018 मध्ये ही मान्यता मिळाली असून तेव्हापासून मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र, त्यानंतरच्या मधल्या काळात स्थगिती सरकार आले. त्यावेळी थोडसा ब्रेक या प्रकल्पाला लागला होता. आता पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर सर्व स्पीड ब्रेकर काढून टाकले तसेच सर्व अडथळे दूर केले आहेत. मुंबईमध्ये नेटवर्कला चालना देण्यात आली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने मेट्रोचे नेटवर्क उभे राहिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page