नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला.
याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राष्ट्रवादीने म्हटलं की, ४ मार्चला कोहिमा येथे झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते, उपनेते, प्रमुख प्रतोद आणि प्रवक्ते यांची निवड करण्यात आली. तसेच सरकारला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षात राहून काम करायचं यावरही चर्चा झाली. यात नवनियुक्त आमदारांनी आणि स्थानिक पक्षनेत्यांनी राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री एन. रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपी सरकारचा भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.