लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उल्का विश्वासराव यांची समन्वय बैठक संपन्न.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | लांजा | मार्च ५, २०२३.
लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा संस्थेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने दि. ५ मार्च रोजी भाजपा उद्योग आघाडी, कोंकण विभाग महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. “लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा ही संस्था गेली ५५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे. या संस्थेसोबत जवळपास ३००० शेतकरी सभासद काम करत असून त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन दुग्धव्यवसाय हेच आहे. या संस्थेने संकलित केलेले दुध शासकीय दुध योजना रत्नागिरी यांना पुरवण्यात येत होते. जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतचे ५ महिन्यांचे बिल अद्याप प्राप्त झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिणामी जनावरांचे खाद्य, कर्जाचे हप्ते आणि घरखर्च यांमुळे शेतकरी बेजार झाले असून या प्रश्नाला समस्येचे रूप प्राप्त झाले आहे.” अशा आशयाचा पत्रव्यवहार मा. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांना उल्काताई विश्वासराव यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. “लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा या संस्थेची शासनाकडून थकीत असलेली रक्कम रु. ३६,२१,३४३/- लवकरात लवकर अदा करणेबाबत संबंधित विभागास आदेश देण्यात यावेत.” अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

या निवेदनाचा स्वीकार करताना मा. श्री. विखे-पाटील यांनी सर्व परिस्थिती विस्तृतपणे जाणून घेतली आणि त्यानंतर त्यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा म्हणून आपण तत्पर सहकार्य करावे आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढावी जेणेकरून शासनाला रक्कम अदा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, असे श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

“यानुसार लांजा येथे दि. ५ मार्च २०२३ रोजी दुध उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यांच्या अडचणी रास्त असल्याने त्यावर सरकार गांभीर्याने उपयोजना करणार असल्याचे आश्वासन मा. मंत्री महोदयांच्या वतीने दिले. तसेच याबाबत पुन्हा अडचणी येऊ नयेत यासाठी प्रकर्षाने लक्ष ठेवण्याची जबाबदारी मी घेईन” असे प्रतिपादन उल्का विश्वासराव यांनी केले. यावेळी उल्का विश्वासराव यांचे सोबत लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा संस्थेचे चेअरमन श्री. अनिल वसंत देसाई, संचालक श्री. अश्रफ रखांगी, संचालक श्री. सीताराम लांबोर, सचिव श्री. श्रीकृष्ण शेट्ये, उपाध्यक्ष श्री. श्रीधर मांडवकर, श्री. विशाल लिंगायत, श्री. शिवाजी जेधे आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page