ठाणे : प्रतिनिधी मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील दिवा उड्डाणपुलाचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाच्या १५ पैकी १० गर्डरची यशस्वी उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. यामुळे पुलाचे रेल्वे हद्दीतील निम्मे काम पूर्ण झाले आहे. ठाणे महापालिकेकडून पुलाच्या जोडरस्त्यांसाठी अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याने दिवा फाटक बंद करण्याची प्रवाशांची मागणी अखेर लवकरच पूर्ण होणार आहे.
दिवा रेल्वे स्थानकातील सी.एस.टी दिशेला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा उड्डाणपूल अस्तित्वात नाही. प्रवासी रेल्वे पादचारी पुलाचा वापर करतात. वाहनांसाठी फाटक असून रोज सुमारे ३०-४० वेळा फाटक उघड-बंद होते. यामुळे लोकल, मेल-एक्स्प्रेस, मालगाड्या यांचा मोठा खोळंबा होतो.
दिवा रेल्वे उड्डाणपुलासाठी तीन टप्प्यांत १५ गर्डर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ३० मीटर लांबीचे एकूण पाच गर्डर आहेत. दुसऱ्या टप्यात प्रत्येकी २४ मीटरचे पाच आणि अंतिम टप्यात प्रत्येकी ३६ मीटरचे पाच असे एकूण १५ गर्डर आहेत. शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १० गर्डरची उभारणी करण्यात आली आहे.
मार्च अखेर उर्वरित शेवटच्या टप्प्यातील गर्डर उभारणी केल्यानंतर दिवा पूल उभारणीचे रेल्वे हद्दीतील काम पूर्ण होईल. सर्व गर्डर उभारल्यानंतर काँक्रिटीकरण आणि रस्ता बनविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
उड्डणपुलाचा जोडरस्ता ठाणे महापालिकेकडून उभारण्यात येत आहे. पुलाच्या पश्चिमेकडे जोडरस्त्याच्या ठिकाणी रहिवासी इमारती आहेत. त्या रिकाम्या करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पूर्वेला जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी पुलांसाठी खांब तयार करण्यात आले आहेत, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उड्डाणपुलाअभावी रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेगाडीचा अंदाज न आल्याने प्रवाशांचा अपघात होतो. गर्दीच्या वेळेत फाटकाच्या दोन्ही दिशेला वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यामुळे फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती.
जाहिरात