डोंबिवली: कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या निळजे गाव हद्दीतील शांती उपवन या अतिधोकादायक इमारतींमधील २५० कुटुंबीयांच्या घरातील आवश्यक सामान बाहेर काढण्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले आहे. या कुटुंबियांतील दोन सदस्य आणि त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाचे जवान पाठवून धोकादायक इमारतींमधील घरातील रोख रक्कम आणि अत्यावश्यक सामान बाहेर काढण्यात आले.
निळजे गावाजवळ असेलल्या शांती उपवन इमारतीला शनिवारी रात्री तडे गेल्यानंतर ही इमारत खचू लागल्याचे दिसताच या गृहप्रकल्पातल्या ५ इमारतींमधील २५० कुटुंबियांना त्याच रात्री घराबाहेर सुखरुप काढण्यात आले. या रहिवाशांमधील बहुतांशी कुटुंबियांमधील मुले दहावी आणि बारावीची परीक्षा देत आहेत. तसेच अनेक घरांत ज्येष्ठ नागरिक, वृध्द आणि बालकांचा सामावेश आहे. तर या कुटूंबीयांना इतरत्र हलवण्यात आले आहे.
इमारतींमधील एफ इमारत पूर्णपणे धोकादायक झाली असल्याने या इमारतींमुळे परिसरातील इमारतींना धोका म्हणून ही इमारत अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने जमीनदोस्त केली जाणार होती. मात्र मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आणि अग्निशमन विभागला विनंती केली, सदर नागरिकांना आपले महत्त्वाचे सामान काढून घेऊन द्या मगच ही इमारत जमीनदोस्त करा, असे सांगितले
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप, सहाय्यक आयुक्त भारत पवार, अग्निशमन विभागाचे प्रमुख नामदेव चौधरी, सुरजकुमार यादव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अग्निशमन प्रमुख अविनाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात कोणताही धोका होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली रहिवाशांनी घरातून सामान बाहेर काढले.
आपत्कालीन पथकांनी रहिवाशांचे सामान सुखरुप बाहेर काढण्यात महत्वाची कामगिरी बजावली. घटनास्थळी आमदार राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत मदत केली. शांती उपवनमधील इमारतींची अनेक वर्षांत देखभाल व दुरुस्ती न केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे, तर आम्हाला आमच्या हक्काचे घर द्या, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. आता शासन-प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते याकडे शांती उपवनमधून बेघर झालेल्या साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
जाहिरात :