
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याआहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
*मुंबई :* उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहेत. आधी राज ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत असल्याचीही चर्चा आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?…
“मतभेद विसरुन दोघे एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर इतकी घाई करू नका, थोडी वाट पाहा,” अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचं स्वागत करतो,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?…
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकत्र येण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीवर प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांबाबत विचारलं असता, ते संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी प्रश्न करणाऱ्या पत्रकाराकडं हात करत, “जाऊदे, काहीतरी कामाचं बोला” असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी घेतली होती राज ठाकरेंची भेट :
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर हजेरी लावली होती. त्यावेळी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती होती. अशातच आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव धुडकावून लावला की काय? अशी चर्चा देखील होत आहे. आमची सदिच्छा भेट होती, त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.