नवीदिल्ली येथील विज्ञान भवन येथे दि. १० व ११ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे दि.१० व ११ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशातील दहा राज्यांमधील प्रत्येकी एक अशा दहा नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव देवरुख नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये यांची निवड झाली आहे. ही बाब रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद अशीच आहे.
या राष्ट्रीय परिषदेसाठी प्लॅटफॉर्मवर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा अध्यक्षांचे नामांकन भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा असून त्यांचेही या परिषदेस मार्गदर्शन लाभणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचे हे तिसरे सेशन असून पहिले सेशन २०१३ साली तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत पार पडले होते. तर दुसऱ्या सेशनचे उद्घाटन २०१७ साली तत्कालीन गृहमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्याहस्ते झाले होते.
नैसर्गिक आपत्ती मधून होणारी हानी कमीत कमी व्हावी याकरिता येणाऱ्या काळात अनेक उपाययोजना शासन स्तरावरून केल्या जात आहेत त्याबाबतचे नियोजन व त्याचा प्रचार प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावा या उद्देशाने सदरची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी देशातील दहा राज्यांमधील प्रत्येकी एक अशा दहा नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये यांची निवड झाली आहे. त्या उद्या बुधवारी दुपारच्या ट्रेनने या परिषदेसाठी रवाना होणार आहेत. तर त्यांची या परिषदेसाठी महाराष्ट्रातून निवड झाल्याबद्दल त्यांचे देवरूखवासियांसह रत्नागिरी जिल्हावासियांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
जाहिरात :