ठाणे : खुर्चीवर बसत असतानाच स्टेज कोसळल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड हे थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. याशिवाय ठाण्यातील मुंब्र्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतल्यामुळं आव्हाड यांच्या अडचणी वाढलेल्या आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांसोबत छोटीशी दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुर्चीवर बसत असताना अचानक स्टेज खाली कोसळले. या दुर्घटनेतून जितेंद्र आव्हाड हे थोडक्यात बचावले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेत जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. मैदानाच्या बाजूलाच स्टेज उभारण्यात आलेलं होतं. आव्हाड आपल्या समर्थकांसह स्टेजवर चढले. खुर्चीवर बसत असतानाच स्टेज खाली कोसळलं. त्यानंतर उपस्थितांनी आव्हाडांचा तोल सावरत त्यांना वाचवलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे.